रामप्रसाद की तेराहवी - चित्रपट
'रामप्रसाद की तेराहवी' बघितला. स्टारकास्ट बघुनच दमायला होईल अशी आहे. सुप्रिया पाठक, नासिर (गेस्ट), विक्रांत मेसी, कोंकणा (यात आणि त्या अजीब दास्तान मध्ये एकच व्यक्ती काय कमाल दिसू आणि काम करू शकतो!!!), विनय पाठक, मनोज पहावा आणि बरेच जण आहेत. रामप्रसाद (नासिर) संगीत शिक्षक आहे तो मरतो आणि म्हणून त्याची चार मुलं, दोन मुली त्यांची कुटुंबं, नातवंडं असा सगळा परिवार त्यांच्या लखनौच्या घरी अंत्यविधी आणि तेरावं करायला म्हणून (नाईलाजाने) एकत्र येतो. एकाच कुटुंबातील लोकं आहेत, पण खूप मोठ्या काळानंतर एकत्र येत आहेत. खलनायल असा कुणीच नाही. प्रत्येक नात्याला एक भूतकाळ आहे. त्यात कुणी नकळत कुणी परंपरेने दुखावलं गेलं आहे.
भूतकाळातील काही फुंकर न घातल्याने कधीच खपल्या न धरलेल्या जखमा कुणी मुद्दाम उघड्या करतं. मध्यमवर्गीय घरात काही कारण नसताना घातलेल्या मर्यादा, किवा कदाचित त्या ओलांडायची कुवत नसल्याने स्वतःवरच घातलेलं मर्यांदांचं कवच धारण करणारी लोकं त्या ओलांडलेल्या इतर नातेवाईकांकडे काहीश्या असुयेने तर काही सूप्त आकर्षणाने बघतात बोलतात. आपल्याकडे केवळ पूर्वी करत म्हणून आजही असणार्या काही निरर्थक परंपरा पाळत, काही मोडत, काही,डोळसपणे बघत तेरा दिवस जात रहातात. कुठेही कसलंही फार जोरकस भाष्य नाही, त्यादिवसात काही विनोदी घडलं तर जसं आपल्याला ही थोडं हसू फुटेलंच ते त्यांना ही फुटतं. सगळी हाडामाणसाची माणसं आहेत. तेरावं आटपतं आणि मुलं मुली आपापल्या घरी जातात. कदाचित.... हो कदाचित काही तरी बारिक दृष्टीकोनात बदल होऊन जातात. काही बहुतेक काहीच फरक न होता जातात. साधा सरळ चित्रपट आहे..
कदाचित म्हणूनच संपल्यावर आपल्याला फार काही 'ग्यान' न मिळाल्याने फार काही 'एनलायटन' वाटत नाही. पण थोडंस अंतर्मुख होऊन नकळत विचार चक्र चालू होतं. जे कदाचित दीर्घकाळ परिणाम करेल. काही मोठा ऐवज मिळाला असता तर तो तेवढ्यापुरता मिळून नंतर स्मरणातून निघुन गेला असता का?
चित्रपटात अनेक पात्र आहेत आणि प्रत्येक छोटी छोटी व्यक्तिरेखा तिचे कंगोरे अगदी ठाशशीपणे मनावर बिंबत जातात. सुरुवातीला कोण कुणाचं कोण असा थोडा गोंधळ उडतो, पण व्यक्तिरेखांची बांधणी फारच अफलातुन आहे.
काल बघितला तेव्हा ठीक वाटलेला, हे आत्ता लिहिताना आणखी आवडला
(नेटफ्लिक्सवर आहे)
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home